Fertigation फर्टिगेशन



*💧अधिक उत्पादनासाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान महत्त्वाचे💧*

-: पाणी आणि खते या शेतीतील दोन अत्यंत महत्त्वाच्या निविष्ठा आहेत. दोन्ही निविष्ठांचा ठिबक सिंचन पद्धतीमधून वापर केल्याने दोन्ही निविष्ठांची कार्यक्षमता 80 ते 90 टक्के मिळते, त्यामुळे पिकाचे अधिक उत्पादन तर मिळतेच आणि उच्चतम गुणवत्ताही मिळते. त्याचबरोबर वापरामध्ये अनुक्रमे 50 ते 60 टक्के आणि 25 ते 30 टक्के बचत होऊन खर्चामध्येही मोठी बचत होते.
राज्यात सुमारे 16 लाख हेक्‍टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन तंत्राचा वापर फळे, भाजीपाला, फुले, नगदी पिके आणि अन्य पिकांसाठी होत आहे. ठिबक सिंचनासोबत पाण्यात विरघळणारी खते वापरण्याच्या तंत्रास फर्टिगेशन तंत्र असे म्हणतात, त्यामुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये 25 ते 30 टक्के बचत होते. खतवापर कार्यक्षमता 40 ते 50 टक्के अधिक मिळते. राज्यात द्राक्षे, हरितगृहातील गुलाब, कार्नेशन, जरबेरा, टोमॅटो, ढोबळी मिरची आदी पिकांसाठी पूर्णपणे फर्टिगेशनचा वापर होत आहे, तर डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा, पेरू, पपई, ऊस, कापूस या पिकांसाठी विद्राव्य खतांचा वापर केला जात आहे.

*फर्टिगेशन का करावे?*
राज्यात ठिबक सिंचन तंत्राचा वापर जरी अधिक होत असला तरी ठिबक सिंचनामधून पाण्यात विरघळणारी खते वापरणाऱ्या खतांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. पिकांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी लागणाऱ्या घटकांपैकी पाणी आणि पोषण अन्नद्रव्ये यांचे खूपच महत्त्व आहे. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी व उत्कृष्ट गुणवत्ता मिळविण्यासाठी या दोन घटकांचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. यांच्या वापराचे नियंत्रण आपल्या हाती असल्यामुळे पिकांच्या गरजेनुसार, अवस्थेनुसार पाणी आणि अन्नद्रव्ये पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात थेंबा थेंबाने अधिक काळपर्यंत देता येतात. कमी वेळात अधिक पाणी दिल्यास पाण्याचा जमिनीतून निचरा होऊन जातो. त्याचबरोबर रासायनिक खतांमधील अन्नद्रव्यांचाही निचरा होऊन जातो, त्यामुळे पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या खोलीचा भाग कायम वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी देणे क्रमप्राप्त ठरते, त्यामुळेच ठिबक सिंचन पद्धतीचा पिकांमध्ये फायदा दिसून आलेला आहे.

फर्टिगेशनसाठी विद्राव्य खतांच्या मात्रा ठरविण्यापूर्वी आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण होणे आवश्‍यक आहे. आपल्या जमिनीचा साम, विद्युत वाहकता, जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात येते. विद्राव्य खतांचा वापर करताना शिफारसप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे. जमिनीत निंबोळीपेंड, कुजलेले शेणखत व गांडूळ खत यांचा वापर करावा.

पिकांच्या विविध अवस्था 

पिके पेरणी अथवा रोपांच्या पुनर्लागवडीनंतर विविध अवस्थांतून वाढत असतात. सुरवातीस वाढीचा कालावधी असतो, त्या वेळी नत्राची आवश्‍यकता अधिक असते. अशा वेळी स्फुरद आणि पालाशची आवश्‍यकता कमी प्रमाणात असते तर नत्राची गरज अधिक असते. अशा वेळी नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण 3-1-1 किंवा 2-1-1 असे असावे. या अवस्थेत 19-19-19 या ग्रेडसोबत युरिया खताचा उपयोग करावा.

*🌿वाढीच्या अवस्थेनंतर पिकांमध्ये🌿* पुनरुत्पादनाची (Reproductive) अवस्था येते, त्या वेळी सूक्ष्म फळांची निर्मिती होते, फुले लागतात, फळधारणा होते, फळांची वाढ होत असते, अशा वेळी स्फुरदाची गरज अधिक असते. अशा वेळी नत्र आणि पालाशचा वापर कमी करावा. अशा वेळी नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण 1-3-1 किंवा 1-2-1 असावे. फुले अधिक यावीत, फळधारणा उत्तम व्हावी, फळांचा, फळभाजीपालांचा आकार मोठा व्हावा यासाठी 13-40-13 किंवा 0-52-34 या विद्राव्य खताच्या ग्रेडसोबत युरिया खताचा वापर करावा. नत्राचा अधिक वापर केल्यास पिकांना फुले उशिरा लागतात.

पुनरुत्पादन अवस्थेनंतर पिके, फळ पक्व होत असतात. या पक्वतेच्या अवस्थेकडे जात असताना फळांना आकर्षक रंग, अधिक गोडी तसेच फळांना अधिक वजन मिळण्यासाठी पोटॅशची अधिक गरज असते. अशा वेळी नत्राची आणि स्फुरदाची गरज अतिशय कमी असते. या अवस्थेमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण 1-0-3.5 असावे. या अवस्थेत 13-0-45 किंवा 0-0-50 या ग्रेडसोबत थोडासा युरिया खताचा करावा. पोटॅशचे अधिक शोषण होण्यासाठी नत्राचा अल्प वापर करावा. पक्वतेच्या वेळी नत्राचा वापर अधिक केल्यास फळांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. पक्वता उशिरा येऊन फळे उशिरा काढणीला येतात.

काही महत्त्वाच्या टीप्स
*1)* टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, गुलाब, कार्नेशन, जरबेरा ही पिके अधिक काळापर्यंत घ्यावयाची असल्यास नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण 2-1-3 असे ठेवावे. यासाठी 16-8-24 या विद्राव्य खताच्या ग्रेडचा वापर करावा.

*2)* नत्रासाठी जमिनीतील तापमानानुसार युरिया किंवा अमोनियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग करावा. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा (फर्टिगेशन) वापर करीत असताना प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य माहीत असणे गरजेचे आहे, तसेच कोणत्या अवस्थेत कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे याची माहिती असणेही गरजेचे आहे.

*3)* फर्टिगेशनमध्ये अन्नद्रव्यांची मात्रा ठरवताना माती परीक्षणाचा अहवाल विचारात घ्यावा. आपणास किती टन वा क्विंटल उत्पादन किती क्षेत्रातून घ्यावयाचे आहे. त्यासाठी किती अन्नद्रव्ये ही पिके जमिनीतून शोषण करतात, यानुसार पिकांच्या शिफारशीनुसार अन्नद्रव्यांची मात्रा ठरवावी.

विद्राव्य खतांचे फायदे
*1)* पाण्यात विद्राव्य असल्यामुळे पिकांस लगेच उपलब्ध होतात.
*2)* निर्यातक्षम गुणवत्तेचे विक्रमी उत्पादन मिळते.
*3)* पिकांना पाणी आणि अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.
*4)* पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार दररोज अथवा दिवसाआड देता येतात.
*5)* थेट पिकांच्या मुळांच्या कक्षेत दिली जातात व ती मुळांना त्वरित उपलब्ध होतात.
*6)* विद्राव्य खते सौम्य द्रावणातून दिली जात असल्यामुळे मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
*7)* खते देण्याची पद्धत अतिशय सोपी व सोयीची असल्यामुळे वेळ, मजूर, खर्च, ऊर्जा, यंत्रसामग्रीची बचत होते.
*8)* रोज कमी मात्रात दिली जात असल्यामुळे अन्नद्रव्ये निचरावाटे, स्थिरीकरणाद्वारा वाया जात नाहीत.
*9)* आम्लधर्मीय असल्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत होते. शिवाय ठिबक संचात क्षार साचत नाहीत. ड्रिपर्स चोक होत नाहीत.
*10)* खतांच्या मात्रेमध्ये 25 टक्के बचत होते.
*11)* सोडियम क्‍लोराईड्‌ससारख्या हानिकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे जमिनीच्या पोताचा ऱ्हास होत नाही. उत्पादनाची गुणवत्ता अप्रतिम राहते.
*12)* हलक्‍या जमिनीतही फर्टिगेशनद्वारा अधिक उत्पादन मिळविणे शक्‍य होते.

*💧फर्टिगेशन करताना कोणती काळजी घ्यावी?💧*
*1)* ठिबक सिंचनची काळजीपूर्वक देखभाल करणे हे महत्त्वाचे ठरते. ठिबक सिंचन संचाची मांडणी ही आराखड्यानुसार असावी.
*2)* सर्वप्रथम ठिबक सिंचन संचातील फिल्टर्स (सॅंड फिल्टर, स्क्रिन फिल्टर) मेन लाइन, सबमेन लाइन, लॅटरल, फिटिंग्ज, व्हॉल्व्ह व फ्लश व्हॉल्व्ह आदी ठिकाणांहून होणाऱ्या गळती (लिकेजेस) पूर्णपणे बंद कराव्यात. ऑनलाइन ड्रिपर्सचा वापर करीत असल्यास शेतातील सर्व ड्रिपर्समध्ये चकत्या आहेत किंवा नाही हे तपासून घ्यावे. जर चकत्या नसतील तर योग्य चकत्या टाकून ड्रिपर्स पूर्ववत करून घ्यावेत.
*3)* ड्रिपर्स जवळ गळती (लेकेजेस) असेल तर तेसुद्धा बंद करावे. अन्यथा, सर्व झाडांना सारखे पाणी न मिळता, त्या प्रमाणात पाण्यासोबत खतेही झाडांना जातील. पर्यायाने खते व पाणी कमी-जास्त मिळाल्यास उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येईल.
*4)* पिकांना इनलाइन किंवा ऑनलाइन ठिबकमधून सर्व ठिकाणी सारखे पाणी मिळते की नाही ते पाहावे. फिल्टरजवळ 1.5 ते 2 कि. चौ. सें.मी. आणि सबमेनच्या शेवटी 1.00 कि./ सें.मी. दाब असावा. तसेच ड्रिपर्सचे झाडापासून अंतर योग्य आहे किंवा नाही ते वारंवार निरीक्षण करीत राहावे.
*5)* खोडाजवळ पाणी देऊ नये. खते आणि पाणी पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रातच द्यावे. लॅटरल नळ्या सरळ बांधून घ्याव्यात किंवा जमिनीवर सरळ ठेवून घ्याव्यात.
*6)* सॅंड फिल्टर सबमेन नियमितपणे साफ (फ्लश) करणे गरजेचे असते. लॅटरल नळ्यांची तोंडे उघडून दर 8 ते 15 दिवसांनी पाण्याने दाब देऊन साफ करून घ्याव्यात.
*7)* पाण्याचा स्रोत विहीर, कालवा, धरण, नदी किंवा तलाव असेल व त्यात शेवाळे, गाळ, कचरा असेल अशा ठिकाणी ठिबक सिंचन संच दीर्घकाळ सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता स्क्रिन फिल्टर सोबत सॅंड फिल्टरची आवश्‍यकता असते.
*8) खते देण्याआधी* झाडांना पाण्याची किती गरज आहे, हे त्या भागातील जमीन, हवामान, झाडाची अवस्था इत्यादी बाबींचा अभ्यास करून निश्‍चित करावी.
*9) साधारणत*ः जमीन दररोज वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी झाडांना दिले पाहिजे. कारण वाफसा स्थितीतच वनस्पती, हवा, पाणी, अन्नद्रव्ये चांगल्या रितीने घेऊ शकते.
*10)* खते देण्याची साधने कोणतीही असो किंवा कालावधीत कितीही असला तरी खतांची तीव्रता 500 ते 1500 पीपीएम एवढी असावी, त्यामुळे फर्टिगेशनच्या कालावधीत खतांच्या तीव्रतेस खूपच महत्त्व आहे. पिकांना जास्त पाणी देऊ नये अन्यथा पाण्याबरोबर खतांचाही निचरा होऊन जाईल. म्हणूनच पिकांना गरजेइतकेच पाणी देणे महत्त्वाचे असते.


Comments

Popular posts from this blog

कापसावरील रोग

Bordo Pest बोर्डो मिश्रण रोगनियंत्रणासाठी

कापूस पिकावरील किड ओळख